अजिंठा चौकातील भंगार बाजारातील अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा!
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरातील वर्दळीचा परिसर असलेल्या अजिंठा चौकातील भंगार बाजारातील अतिक्रमणावर आज दिनांक ३० सप्टेंबर बुधवार रोजी जळगाव शहर महानगरपालिकेने पोलीस प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्तात धडक कारवाई केली.महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने दोन जेसीबीच्या साहाय्याने भंगार बाजार रस्त्यावर आणि फुटपाथवर उभारण्यात आलेले अनधिकृत पत्र्याचे शेड, दुकाने आणि पक्के बांधकाम जमीनदोस्त केले. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता, तसेच याची दखल घेत मनपाने ही कारवाई केली.या अचानक झालेल्या कारवाईमुळे भंगार बाजारातील दुकानदारांमध्ये तारांबळ उडाली . कारवाई सुरू असताना खबरदारीचा उपाय म्हणून अजिंठा चौकाकडील वाहतूक काही काळासाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती.या कारवाईवेळी महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.